पोट निवडणूक : राज्यात विधीमंडळात उलथापालथ होण्याच्या हालचाली
एकीकडे सगळ्यांना लोकसभा निवडणुकांचे वेध लागले असतांना राज्यात विधीमंडळात आणखी उलथापालथ होण्याच्या हालचाली सुरु होत आहेत.
अमित जोशी, मुंबई : एकीकडे सगळ्यांना लोकसभा निवडणुकांचे वेध लागले असतांना राज्यात विधीमंडळात आणखी उलथापालथ होण्याच्या हालचाली सुरु होत आहेत. ७ जूनच्या विधानपरिषदच्या एका जागेसाठीच्या पोट निवडणूक होणार आहे. त्यामुळे या हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानपरिषदचे माजी सभापती आणि ज्येष्ठ सदस्य असलेले शिवाजीराव देशमुख यांच्या निधानामुळे एका जागेसाठी ७ जूनला निवडणू होत आहे. यानिमित्तानं विधानसभेच्या राजकीय लढाईची इथे चाचपणी केली जाणार आहे.
विधानपरिषदेच्या एका जागेची पोटनिवडणुक जिंकणे भाजपला सहज शक्य आहे. गेल्या सहा महिन्यांत एकूण ५ आमदारांनी राजीनामे दिले आहेत, जे मंजूर झाले आहेत.
विधानसभेतील संख्याबळ
भाजप - १२०
शिवसेना - ६१
काँग्रेस - ४२
राष्ट्रवादी - ४०
बहुजन विकास आघाडी - ३
शेकाप - ३
एमआयएम -२
समाजवादी - १
रासप - १
कम्युन्सिट - १
अपक्ष - ७
नामनियुक्त - १
एक जागा रिक्त
हे संख्याबळ लक्षात घेता भाजपचाच उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र, आता विधान परिषदमध्ये एक जागा भाजपची वाढल्याने युतीची ताकदही एकाने वाढत आहे. यामुळे सभापती आणि रिक्त असलेल्या उपसभापती पदासाठी निवडणूक होणार का, हा खरा प्रश्न आहे. सभापती भाजपकडे आणि उपसभापती शिवसेनेकडे असे वाटप होणार का याकडेही सर्वांच लक्ष लागून राहिलेले असेल.
विधान परिषदमधील संख्याबळ
राष्ट्रवादी काँग्रेस - १७
काँग्रेस - १६
भाजप - २२
शिवसेना - १२
लोकभारती - १
शेकाप - १
रासप - १
आरपीआय ( कवाडे ) - १
अपक्ष - ७
एक जागा रिक्त
शिवसेना - भाजप मिळून संख्याबळ ३४, रासप एक आणि ३ अपक्ष ना. गो. गाणार, किशोर दराडे, प्रशांत परिचारक हे युतीबरोबर असे ३८ चे संख्याबळ युतीकडे आहे. तर काँग्रेस - राष्ट्रवादी मिळून ३३, लोकभारती-शेकाप-आरपीआय कवाडे गट प्रत्येकी एक आणि एक अपक्ष असे ३७ संख्याबळ काँग्रेस आघाडीकडे आहे. काँग्रेसची एक जागा रिक्त आहे. जी भाजपकडे जाणार आहे. तर दोन अपक्ष यांपैकी श्रीकांत देशपाडे हे स्वतंत्र भूमिका घेणारे असले तरी ते भाजपला साथ देतील असे भाजप दावा करत आहे. तर दत्तात्रय सावंत कोणाला साथ देतील याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असे.
सध्या सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि यावर भाजप दावा करणार आहे. मात्र हे करतांना उपसभापती पद शिवसेनेला देणार का हेही बघणे महत्तवाचे ठरणार आहे. का राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सभापती पद राष्ट्रवादीकडेच कायम ठेवत पडद्यामागे आणखी काही पदरांत पाडून घेणार का हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे.