पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार निश्चित?
मंत्रिमंडळ विस्तार ते अधिवेशन अखेर मुहूर्त ठरला? पाहा कधी होणार
मुंबई : बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर गेला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत नाराजी टाळण्यासाठी लांबणीवर गेल्याची चर्चा आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर 19 ते 21 जुलैदरम्यान मंत्रिमंडळ विस्तारा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्यात 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. तर मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेल्याने पावसाळी अधिवेशन देखील उशिराने होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या नाराजीची भीती, शिंदे गटाकडून अधिकच्या मंत्रिपदाची मागणी त्याबरोबरच भाजपमध्ये मंत्रिपदासाठी होत नसलेले मतैक्य या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे सरकारचा शपथविधी लांबणीवर पडला आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नाराजी नाट्य होऊन याचा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतरच 19 ते 21जुलैच्या दरम्यान माहिती सूत्रांनी दिली आहे.
30 जून रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. त्यानंतर तीन आठवडे उलटून मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे गंगेत न्हाले नाही. भाजपला 29 आणि शिंदे गटाला 8 कॅबिनेट व 5 राज्यमंत्री अशी 13 मंत्रिपदे देण्याचे ठरले होते.
शिंदे गटात ठाकरे सरकारमधील 7 मंत्री आहेत. त्यांना मंत्रिपद द्यावे लागणार आहे. शिंदे गटात 40 बंडखोरांसह 10 अपक्ष आहेत. म्हणूनच शिंदे गटाला अधिकची मंत्रिपदे पाहिजे आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 25 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेत येतात याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.