मुंबई : थर्टी फर्स्टच्या तयारीसाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. नव्या वर्षाचे स्वागत करताना तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आता पोलिसही सज्ज झाले आहेत. नियमांचे पालन करून नव्या वर्षाचे स्वागत करणार असाल तर ते नक्कीच तुमच्या आनंदावर विरजण घालणार नाही. मात्र, जर का अतिरेकपणा झाला तर मात्र तुमच्यावर कारवाई झालीच म्हणून समजा.     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थर्टी फर्स्टच्या अर्थात ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईतील गजबजलेल्या भागात दहशतवादी काही अप्रिय घटना घडवू शकतात असा अलर्ट महाराष्ट्र पोलिसांना केंद्रीय यंत्रणांकडून मिळाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या सर्व सुट्या आणि साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.   


मुंबईत खलिस्तानी दहशतवादी कारवाया करू शकतात, असा अलर्ट केंद्रीय यंत्रणांकडून मिळाला आहे. त्यातच उद्या थर्टी फर्स्टसाठी विविध ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे राज्य सरकार आणि महापालिकेने मुंबईत निर्बंध घातले आहेत. त्यामुळे उद्या मुंबईत अधिक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच, दंगल नियंत्रण पथकेही तैनात करण्यात येणार आहेत.


दरम्यान, 31 डिसेंबर रोजी वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलीस उपायुक्त, नितीन पवार यांनी दिला आहे. पश्चिम उपनगरात मॉल, चौपाटी अशा 35 ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात येणार आहे. तसेच, वाहतूक नियमाचे पालन करणाऱ्यांना पोलिसाच्यावतीने अनोखी भेट देखील देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.