COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : खारघरच्या टाटा रूग्णालयात कॅन्सर रूग्णांसाठी प्रोटोन बीम थेरेपी केंद्राचे काम आता दुसऱ्या टप्प्यात पोहचंलय...प्रोटोन बीम बनवण्याच्या प्रक्रीयेला प्रत्यक्षात सुरूवात झाली असून याचा पहीला टप्पा यशस्वीरित्या पार पडलाय. आतापर्यंतच्या कॅन्सर उपचार पद्धतींपेक्षा ही सोपी आहे..आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी इथे मोफत उपचार होणारेय..


कॅन्सरवर प्रभावी उपचार करणारी 'प्रोटोन थेरपी' आता खारघरच्या टाटा रुग्णालयात एप्रिलपासून प्रत्यक्षात सुरु होऊ शकते. याद्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना अत्यल्प अथवा मोफत उपचार घेता येणार आहेत. 


प्रोटोन थेरेपी सेंटरचं तीन टप्प्यात काम सुरु आहे. पहिला रिगींगचा टप्पा २९ जानेवारीला झाला. दुसरा टप्पा बीम ऑन डीग्रेडर हा उद्यापासून सुरु होतो. यामुळे प्रोटोन तयार होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर एप्रिलमध्ये आम्ही पहील्या रुग्णावर उपचार करु असे टाटा मेमोरियलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले. 


सर्वसामान्यांसाठी ही ट्रीटमेंट नव्हती पण आता लहान मुलांना देखील याचा फायदा होणार असे टाटा मेमोरियलचे उपसंचालक डॉ. सिद्धार्थ लष्कर यांनी सांगितले. कोरोना काळातही वेगाने काम करत आम्ही वेळेआधी काम सुरु पूर्ण करत असल्याचे आयबीएचे संचालक राकेश पाठक यांनी झी २४ तासला सांगितले. 
 
खारघर टाटा रुग्णालयाच्या गेटमधून उजवीकडे असलेली ६ हजार ५०० स्केअर फूट जागेतील अद्ययावत वास्तू कॅन्सर रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे. कॅन्सर झालेल्या रुग्णांसमोर किमो, सर्जरी आणि रेडीएशन थेरपी हे पर्याय असतात. पण रेडीएशन प्रकारात मोडणारी 'प्रोटोन थेरपी' ही या सर्वात अत्याधुनिक मानली जाते. विदेशात या थेरपीची किंमत ७० लाखांच्या घरात असून भारतातही यासाठी साधारण ४० लाखांचा खर्च येतो. भारत सरकारतर्फे आर्थिकदृष्ट्या कमजोर गटासाठी ही सुविधा मोफत मिळू शकणार आहे. 


इतर उपचार पद्धतीमध्ये रुग्णाच्या ट्यूमरसोबत इतर निरोगी पेशींनाही हानी पोहोचते. तसेच शरीरावर डाग राहतात.. पण प्रोटॉन बीममध्ये केवळ ट्यूमरला लक्ष्य केले जाते. यातून कोणतेही डाग राहत नाहीत. इतर ऑपरेशनमध्ये जास्त वेळ लागतो, रुग्णाला त्रास जाणवतो पण प्रोटोन थेरपीमध्ये तुलनेत वेळ कमी लागतो. इतर उपचार पद्धतीमध्ये रुग्णाचे शरीरावरील केस गळतात. पण प्रोटोन थेरपीमध्ये केस गळती होत नाही. 



आयबीए कंपनीतर्फे इथे साधारण हजार टनची आधुनिक यंत्रणा बसवण्याचे काम सुरु आहे. ही यंत्रणा प्रोटोन थेरपीद्वारे कॅन्सरवर प्रभावी उपचार करते. साधारण ७०० कोटींचा हा संपूर्ण प्रकल्प आहे. संचालक राकेश पाठक यांच्या नेतृत्वाखाली आयबीएच्या १३ इंजिनिअर्सची टीम सध्या या यंत्रणेवर काम करत आहे.