Mumbai : खड्डा चुकवण्याच्या नादात तिघांचा बळी गेल्याची घटना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. पालघर जिल्हातील डहाणू येथील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway Accident) रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास महालक्ष्मी मंदिरासमोरील पुलावर हा अपघात झाला असून तिघांचा मृत्यू झालाय. तर चार प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात एक वर्षाच्या चिमुकलीचाही दुर्दैवी मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नालासोपारा पश्चिम येथील राठोड कुटुंबीय गुजरातच्या दिशेने निघालं होतं. यावेळी महालक्ष्मी मंदिराजवळ दुपारी सव्वा वाजल्याच्या सुमारास खड्डा चुकवताना त्यांच्या कारचा अपघात झाला अशी माहिती पुढे आली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खड्डा चुकताना कारचा चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारवरील ताबा सुटला आणि ती पुढे असलेल्या कंटेनवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील तिघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


"प्राथमिक दृष्टया असे दिसते की चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते महामार्गावरील एका ट्रकला मागून धडकले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत,"पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. कासा पोलिस आयपीसी आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेत आहेत, असेही बाळासाहेब पाटील म्हणाले.


या अपघातात दीपेश नरोत्तम राठोड (वय 35 वर्ष), तेजल दीपेश राठोड (32 वर्ष), मधु नरोत्तम राठोड  (58 वर्ष), स्नेहल दीपेश राठोड (अडीच वर्ष) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर नरोत्तम छना राठोड (65 वर्ष), केतन नरोत्तम राठोड (32 वर्ष), आर्वी दीपेश राठोड (एक वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.