मुंबई : सीएसएमटीजवळील कोसळलेल्या पुलाची देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षा ज्या संस्थांवर आणि व्यक्तींवर आहे त्या संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं मुंबई पोलिसांचे प्रवक्ते मंजुनाथ सिंघे यांनी सांगितलं आहे. मुंबईत सीएसएमटी येथे झालेल्या पूल दुर्घटनेत ६ जणांना जीव गमवावा लागला. यासंदर्भात २४ तासांत रिपोर्ट देण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. त्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दक्षता विभागाला दिले आहेत. या पुलाचे ऑडिट योग्य झाले होते का? दुरुस्ती सुचवली होती, ती करण्यात आली होती का ? जर झाली नसेल का झाली नाही? असे प्रश्न आयुक्तांनी उपस्थित केले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे अहवालात असली पाहिजते असा आदेश आयुक्तांनी दिला आहे. काल झालेल्या दुर्घटनेनंतर पालिकेने स्वत:वरील जबाबदारी झटकत हा पूल रेल्वेच्या अख्त्यारीत येत असल्याचे सांगितले होते. पण आज पालिकेला उपरती आली असून हा पूल आपलाच असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे पूल दुर्घटनेचं प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. २२ मार्चला सीएसएमटीजवळील हिमालय दुर्घटनेप्रकरणी सुनावणी होणार आहे. एलफिन्स्टन पूल दुर्घटनेप्रकरणी दाखल याचिकेत गुरुवारच्या दुर्घटनेचा मुद्दा वाढवण्याची याचिकाकर्त्यांनी मागणी मान्य केली. ही मागणी न्यायालयानं मान्य केलीय. मुंबईत सतत होणाऱ्या पूल दुर्घटनांप्रकरणी रेल्वे जनरल मॅनेजर, पालिका आयुक्त आणि महापौरांवर गुन्हे दाखल करण्याची मुख्य याचिकेत मागणी केली आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेरचा पादचारी पूल कोसळल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं संतापजनक राजकारण सुरू झालंय. मनपा आणि रेल्वे एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात मश्गूल आहेत. तर विरोधीपक्ष नेते रवी राजा यातून मनपावर दोषारोप करत आहेत. ऑडीटकरून देखील मुंबईत पूल पडत असेल तर सत्तेतील लोकांची हकालपट्टी करा. या घटनेला महापालिका आयुक्तही जबाबदार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेकडे पैसा असूनही वारंवार मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.