बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : पोलीस निरीक्षक दीपक सुर्वेवर गुन्हा दाखल झाला आहे. चुनाभट्टी बलात्कार प्रकरणातील तापसबद्दल माहिती मागण्यासाठी  मुलीचा भाऊ  गेला होता त्यावेळी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले दीपक सुर्वे यांनी शिवीगाळ केली आणि अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप मुलीच्या भावाने केला. त्याअंतर्गत चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दीपक सुर्वेंवर योग्य ती कारवाई व्हावी असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. 


चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिन्यांपूर्वी १९ वर्षीय तरुणीचा सामूहिक बलात्कार झाला होता. या तरुणीचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला मात्र अजूनही आरोपी मोकाट असून त्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. 


सदर प्रकरणी तापसबाबत माहिती घेण्यासाठी मुलीचा भाऊ पोलीस ठाण्यात गेला होता तेव्हा ही घटना घडली. दिलीप सुर्वे हे नेहरूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी त्यांच्याकडे चुनाभट्टी पोलीस ठाण्याचा अतिरिक्त भार देण्यात आला होता.


सुप्रिया सुळेंनी काढला होचा मोर्चा 


चेंबूर सामूहिक बलात्कारप्रकरणी राष्ट्रवादीकडून नुकताच चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग पाहायला मिळाला. मोर्चादरम्यान, राष्ट्रवादीने जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चा चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर पोहोचला असता पोलिसांनी सुप्रिया सुळेंना पोलीस स्टेशनबाहेर अडवण्यात आलं. ज्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.  


मुंबईमध्ये सामूहिक अत्याचाराला बळी पडलेल्या मूळच्या जालना येथील तरूणीच्या मृत्यूप्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल द्या आणि आरोपींना तातडीने अटक करा, अशा सूचनाही आयोगाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे या प्रकरणी राज्य महिला आयोग उशीरा जागं झालं आहे. महिला आयोग झोपला होता का असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.