खाजगी गुप्तहेर यांच्या कार्यपद्धतीबाबत विधानपरिषदेत पडसाद
देशातील पहिल्या खाजगी गुप्तहेर महिला रजनी पंडित यांच्या अटकेच्या निमित्ताने खाजगी गुप्तहेर यांच्या कार्यपद्धतीबाबत विधानपरिषदच्या कामकाजात चर्चा झाली.
मुंबई : देशातील पहिल्या खाजगी गुप्तहेर महिला रजनी पंडित यांच्या अटकेच्या निमित्ताने खाजगी गुप्तहेर यांच्या कार्यपद्धतीबाबत विधानपरिषदच्या कामकाजात चर्चा झाली.
खासगी गुप्तहेराच्या कॉल डाटा मिळवण्याच्या कामाच्या पद्धतीमुळे व्यक्तीच्या खासगी आयुष्याच्या अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला. याबाबत संभाषण रेकॉर्ड करणारं एक उपकरणच यावेळी सभागृहात दाखवण्यात आलं.
तेव्हा या संपुर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण 12 जणांना अटक झाल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी यावेळी दिली. या कारवाईमध्ये राईट टू प्रायव्हसी ऍक्टचा भंग होणं हा प्रमुख गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र ही शिक्षा वाढवण्याच्या बाबातीत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
तसंच विविध डीव्हाईसद्वारे आवाज रेकॉर्ड केल्या जाणा-या जाहिराती वर्तमानपत्रात येतात. त्याबाबतही पोलिसांकडून एक मोहीम सुरु करुन सर्व एजन्सींची तपासणी केली जाणार असल्याचं यावेळी जाहीर केलं गेलं. तर खासगी गुप्तहेरबाबत नियम करण्याबाबात केंद्राकडे पाठपुरवा करणार असल्याचं रणजीत पाटील यांनी स्पष्ट केलं.