दीपाली जगताप - पाटील/ मुंबई : गेल्या काही वर्षांत भारतातही हॅलोवीनची क्रेझ वाढलीय... या आठवड्यात मुंबईत देखील 'हॅलोवीन डे' दिमाखात साजरा होणाराय... पण यानिमित्तानं पोलिसांची डोकेदुखी वाढणाराय... काय असतो हा हॅलोवीन डे? तो नेमका कसा साजरा होणाराय? पाहूयात हा खास रिपोर्ट...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशात धुमाकूळ घालणारा हॅलोवीन... अलिकडच्या काही वर्षांत भारतालाही हॅलोवीननं झपाटलंय... राजधानी मुंबईत तर हॅलोवीन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तरुणाई आणि लहान मुलांमध्ये या हॅलोवीन पार्ट्यांची जबर क्रेझ आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करण्यात आघाडीवर असलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांनी यंदाही हॅलोवीन पार्ट्या आयोजित केल्यायत. या पार्ट्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात सहभागी होणारे सगळे भूताखेतांच्या वेशभूषेत पार्ट्यांना येतात. तरूणाईपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सगळेच या पार्ट्यांमध्ये भाग घेतात... सध्या सोशल मीडियावरही हॅलोवीन गेटअपमधील फोटोंनी धुमाकूळ घातलाय. 


हॅलोवीन पार्टी ही परदेशी संकल्पना असली तरी त्यामागं धार्मिक कारणंही आहे.  


काय आहे ''हॅलोवीन डे''


31ऑक्टोबरला हॅलोवीन डे साजरा करण्याची प्रथा पाश्चिमात्य देशांमध्ये आहेत. वर्षभरात मृत पावलेल्या आत्म्यांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. या दिवशी नवीन शरीर शोधून मृतात्मे त्यात प्रवेश करतात अशी आख्यायिका असल्यानं भूतांना पळवून लावण्यासाठी भयानक मुखवटे घालून आणि भीतीदायक वातावरण निर्माण करण्याची प्रथा परदेशात आहे.  
 
पाश्चिमात्य देशांमध्ये 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी हा दिवस साजरा केला जात असून गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील मेट्रो शहरांमध्ये हॅलोवीन डेचं फॅड वाढू लागलंय. यंदा तर मुंबईत 20 हून अधिक हॅलोवीन पार्ट्यांचं आयोजन करण्याच आलंय.


मुंबईत आयोजित होणा-या या हॅलोवीन पार्ट्यांच्या निमित्तानं रात्रीच्या वेळी मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवलीय. या पार्ट्यांमधील ड्रींक अँड ड्राईव्ह घटनांकडंही पोलिसांचं लक्ष असणाराय. मुंबई पोलिसांनी हॅप्पी हॅलोवीनच्या शुभेच्छा देतानाच, तरुणांना सावधानतेचा इशाराही दिलाय.


थर्टी फर्स्टला पार्टी करून इंग्रजी नववर्षाचं धुमधडाक्यात स्वागत करण्याची संस्कृती आपल्याकडं कधीचंच रूजलीय... आता भूतांच्या वेशभूषेतल्या हॅलोवीन पार्ट्या तरूणाईला आकर्षित करतायत... कालांतरानं हॅलोवीन हा संस्कृतीचा भाग झाला तर नवल  नाही.