मुंबई : मुंबईकरांना आता स्मशानभूमींची सद्यस्थिती तात्काळ ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. यासाठी महापालिकेने संगणकीय 'डॅश बोर्ड' तयार केलं आहे. याचं काम अंतिम टप्प्यात असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत हे 'डॅश बोर्ड'कार्यान्वित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९१६ या नागरी सेवा सुविधाविषयक दूरध्वनी क्रमांकाशी हा 'डॅश बोर्ड'जोडण्यात आला आहे. या क्रमांकावरून सगळी माहिती मिळणार आहे. जशी की कुठल्या स्मशानभूमीत किती अंत्यसंस्कार सुरू असून, पुढील अंत्यसंस्काराची वेळ ऑनलाइन घेता येणार आहे. 


मुंबई पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे प्रत्येक स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या मृतदेहांची आकडेवारी 'अपडेट' केली जाणार आहे. यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आलं आहे. 


या डॅशबोर्डच्या मदतीने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यापूर्वी संबंधित नातेवाईकांना स्मशानभूमीची सद्यस्थिती दूरध्वनीद्वारे कळणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेद्वारे ४६ ठिकाणी पारंपरिक स्मशानभूमीसह विद्युत आणि गॅसदाहिनी असणाऱ्या स्मशानभूमी आहेत. 



या प्रकारची १८ चितास्थाने पालिका क्षेत्रात असून, त्यात २४ तासांत १४४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतात.पारंपरिक पद्धतीनुसार जळाऊ लाकूड वापरून अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईत २१९ चितास्थाने आहेत. या प्रत्येक चितास्थानाची कमाल क्षमता २४ तासांत सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे. 


२१९ चितास्थानांची एकत्रित क्षमता ही २४ तासांत एक हजार ३१४ मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्याची आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमींवर ताण येत असल्याने मृतांच्या नातेवाईकांना वस्तूस्थिती कळावी यासाठी ही माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.