मुंबई : युरोपात आढळलेला कोरोनाचा XE व्हेरियंट (Corona XE Varient) मुंबईत आढळल्याची माहिती महापालिकेनं (BMC) दिली होती. मात्र केंद्र सरकारनं (Central Goverment) हा दावा फेटाळत अधिक तपासणी आवश्यक असल्याचं म्हटलंय. (central government has rejected bmc claim that an corona xe variant was found in mumbai) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या कापा आणि XE या नव्या घातक व्हेरियंटनं मुंबईत प्रवेश केल्याचं मुंबई महापालिकेनं जाहीर केलं. त्यामुळं मुंबईकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला.  मात्र केंद्राच्या आरोग्य मंत्रालयानं XE व्हेरियंट सापडल्याचा मुंबई महापालिकेचा दावा फेटाळलाय. 



परदेशातून आलेल्या एका 50 वर्षीय महिलेची चाचणी करण्यात आली. RT-PCR चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर महापालिकेनं जिनोम सिक्वेन्सिंग केलं. यात कोरोनाचा XE व्हेरियंट आढळल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. मात्र केंद्र सरकारच्या INSACOG या संस्थेनं हा दावा फेटाळलाय.


महिलेमध्ये आढळून आलेला व्हायरस हा XE असल्याचं दिसत नाही, असं या संस्थेचं म्हणणं आहे. त्यामुळं आता आणखी चाचणी होणार असून त्यानंतरच XE व्हेरियंट आहे की नाही, हे स्पष्ट होणाराय.


दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही घाबरण्याचं कारण नसल्याचं म्हटलंय. असं असलं तरी सावध राहणं आवश्यक आहे. कारण XE व्हेरियंटची लक्षणं ही आधीच्या कोरोनापेक्षा काहीशी वेगळी आहेत. 


काय आहेत XE कोरोनाची लक्षणं?


XEची लागण झाल्यास नाक वाहणं, शिंका येणं, घशात खवखव अशी लक्षणं दिसतात. मूळ व्हायरसमधील ताप, खोकला ही लक्षणं XEमध्ये आढळत नाहीत. चव न लागणं, वास न येणं ही पूर्वीची लक्षणं XE व्हेरियंटमध्येही दिसून येतायत. 


राज्यात कोरोना आटोक्यात आल्यामुळे मास्कसह सर्व निर्बंध हटवण्यात आलेत. त्यामुळे आपणही निर्धास्त झालोय. मात्र कोरोना अद्याप संपलेला नाही. कापा, XE सारखे नवे व्हेरियंट आज ना उद्या येणारच आहेत. आपण सावध राहिलो, तर मोठी लाट येण्यापासून रोखू शकतो.