पेंटाग्राफवर पत्रा पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत, जलद मार्गावर धीम्या गाड्या
ठाणे आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने मध्ये रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली.
मुंबई : ठाणे आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने मध्ये रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली. मुलुंड स्थानकात पेंटाग्राफवर पत्रा पडल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. गाड्या 30 ते 40 मिनिटांनी उशिराने धावत होत्या. तसेच धीम्या मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर वळविण्यात आल्याने प्रवाशांना मोठी कसरत करावी लागली. उद्घोषणा उशिरा करण्यात येत असल्याने प्रवाशांना दुसऱ्या फलाटाकडे जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अनेकांना जलद मार्गावरुन धावणाऱ्या धीम्या गाड्यांपर्यंत जाता येत नव्हते. त्यामुळे प्रवाशांना तास-तास गाडीसाठी तिष्ठत बसावे लागले होते. हा गोंधळ कुर्ला येथे पाहायला मिळत होता. दरम्यान, चारनंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र, धीम्या मार्गावरील गाड्या या 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावत आहेत.
टिटवाळा लोकलचा बिघाड दुरुस्त झाला. मात्र त्याच्यामागे असलेल्या अंबरनाथ लोकलमध्येही तांत्रिक बिघाड असल्याच्या उदघोषणा सुरु करण्यात येत होत्या. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त होण्यास काही वेळ लागेल असे सांगण्यात येत होते. तसेच जलद मार्गावरून काही धीम्या लोकल सुरु आहेत, असा फलक लावण्यात आला. मात्र धीम्या आणि जलद मार्गावर बराचवेळ एकही लोकल सुटत नसल्याने प्रवाशांचा दुपारी गोंधळ पाहायला मिळाला. मध्य रेल्वेचा हा भोंगळ कारभार कायम सुरु असल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दुपारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सलग पाचव्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुंलुंड स्थानकात शॉर्ट सर्किट झाल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले. मुलुंड रेल्वे स्थानकात शॉर्ट सर्किच झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.
गुरूवारी संध्याकाळीही ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून वळवण्यात आली होती. तसेच मंगळवारी सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईतील प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.
दरम्यान, उद्घोषणाही करण्यात येत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. सलग पाचव्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मध्य रेल्वेच्या कारभाराबाबत प्रवाश्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.