ठाणे: ठाणे-वाशी-पनवेल मार्गावर गुरुवारपासून वातानुकूलित रेल्वेसेवेचा शुभारंभ होणार आहे. यानंतर उद्यापासून सामान्य प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येईल. ठाणे-वाशी-नेरूळ-पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकलच्या दररोज १६ फेऱ्या धावणार आहेत. या लोकलची पहिली फेरी पहाटे ५.४४ वाजता पनवेल-ठाणे मार्गावर होईल, तर ठाणे-पनवेल मार्गावर रात्री ९.५४ ला शेवटची फेरी असेल. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या उपस्थितीत आज एसी लोकलला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल दोन वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेमार्गावर देशातील पहिली वातानुकूलित रेल्वे धावली होती. तेव्हापासून मध्य रेल्वेवर एसी लोकल कधी धावणार, याची प्रतिक्षा प्रवाशांना होती. मध्य रेल्वेवरील पहिल्या एसी लोकलचे सारथ्य मोटर वुमन मनीषा म्हस्के करणार आहेत.


ही एसी लोकल अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. प्रत्येक कोचमध्ये वातानुकूलनासाठी १५ टन क्षमतेचे दोन रूफ माऊंटेड पॅकेज युनिट्स (आरएमपीयू) असतील. या लोकलमध्ये आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी टॉकबॅक यंत्रणा असेल. याशिवाय, दोन्ही दिशेला ड्रायवरच्‍या मागील डब्यांत इंग्रजी आणि हिंदीमध्ये एलईडी आधारित हेड कोड डिस्प्ले असतील.


दरम्यान, वातानुकूलित रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून व्यापारी संकुलांतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून या लोकलच्या प्रवासाला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले.