`मरे`चा ढिसाळ कारभार, कल्याण-ठाणे वाहतूक १५ मिनिटं ठप्प
मध्य रेल्वे काही सुधरेना...
मुंबई : मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कल्याण-ठाणे वाहतूक सेवा तब्बल १५ मिनिटं बंद होती. कळवा येथील रेल्वे फाटक उघडे असल्यामुळे १५ मिनिटं एकही गाडी पुढे जावू शकली नाही. त्यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांचा देखील खोळंबा झाला.
मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा फटका ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना बसला. कळवा इथे असलेलं रेल्वे फाटक तब्बल १५ मिनिटं रेल्वेने उघडं ठेवलं. सकाळी १०.४५ ते ११ पर्यंत रेल्वे फाटक उघड ठेवल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. त्यानंतर फाटक बंद करण्यात आलं. मात्र गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. खोळंबलेल्या गाड्यांमुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं.
मध्य रेल्वे काही सुधारण्याचं नाव घेत नाही आहे. सतत उशिरा धावणारी वाहतूक सेवा आणि कधीही कोलमडणारी सेवा अशी आता मध्य रेल्वेची ओळख झाली आहे. मध्य रेल्वे मात्र यातून काहीही धडा घेण्याचं नाव घेत नाही आहे.