मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेनं प्रवाशांना सुखद धक्का दिलाय. मध्य रेल्वेच्या मस्जिद स्थानकातील पादचारी पूल अवघ्या ३३ दिवसात पूर्ण करून नवा विक्रम नोंदवलाय. अगदी मुदतीच्या १२ दिवसांआधीच पुलाचं काम पूर्ण करण्यात आलंय. २६ नोव्हेंबरला प्रवाशांकरता हा पूल बंद करण्यात आला होता. सीएसएमटीच्या दिशेला असलेला हा पूल बांधण्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून मूळ पुलापेक्षा या पुलाची लांबी-रुंदी वाढवण्यात आलीय. मध्य रेल्वेनं याआधी कुर्ल्याचा पादचारी पूल ७७ दिवसात पूर्ण केला होता. हा विक्रम मोडीत काढून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हा पूल अवघ्या ३३ दिवसात पूर्ण केला. विक्रमी वेळेत पूल बांधून पूर्ण केल्याबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएसटीएमकडे जाणाऱ्या या पुलाला तोडण्याआधी रेल्वेकडून त्याचं परीक्षण करण्यात आलं होतं. २६ नोव्हेंबरपासून जुना ब्रिज पाडून नवीन ब्रिज उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. या संपूर्ण कामासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागेल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. परंतु, केवळ ३३ दिवसांत हे काम पूर्ण झालं.