मध्य रेल्वे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहतेय का?
आज सलग चौथ्या दिवशी कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
मुंबई : आज सलग चौथ्या दिवशी कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
लोकल सेवा ठप्प असल्यानं आज सकाळी संतप्त प्रवाशांनी वासिंद स्थानकात रेल रोको आंदोलन सुरू केलं. चार दिवस उलटले तरी लोकल वाहतूक कधी सुरू होणार? याबद्दल कुठलीही निश्चित माहिती देण्यात येत नाही.
दरम्यान, आजही मध्य रेल्वेची लोकल वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे. मंगळवारी नागपूर दुरांन्तो एक्स्प्रेसच्या अपघातानंतर अजूनही कसारा-टिटवाळा लोकल वाहतूक ठप्प आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून टिळवाळ्यांहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. काल रात्री दहा वाजेपर्यंत पूर्व आणि उत्तरेकडून येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेनं एका परिपत्रकाद्वारे जारी केलीय. त्यामुळे कसारा, खर्डी, आटगाव आसनगाव, वासिंद आणि खडवली येणाऱ्या लोकलच्या प्रवाशांना आज त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे याच मार्गावरून येणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्या मात्र कल्याणच्या दिशेनं रवाना होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या संतापात भर पडत आहे. त्याचप्रमाणे आजही अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.