पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले, डबे सोडून इंजिन पुढे धावले; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबई: कल्याण स्थानकानजीक पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे गुरुवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. येथील पत्री पूलाच्या परिसरात पंटवटी एक्स्प्रेसचे कपलिंग अचानकपणे तुटले. त्यामुळे इंजिन फक्त दोन डबे घेऊन पुढे गेले आणि गाडीचे उर्वरित डबे मागे राहीले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पंचवटी एक्सप्रेस थांबवण्यात आली. सुरुवातीला कपलिंग तुटल्यानंतर डबे सोडून इंजिन पुढे गेल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र, त्यानंतर लगेचच पंटवटी एक्स्प्रेस थांबवण्यात आली. दरम्यान, या सगळ्या गोंधळामुळे मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्यांचा खोळंबा झाल्याने जलद गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. एक्स्प्रेसचे कपलिंग जोडून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ जावा लागेल. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. पत्री पुलाजवल लोकल गाड्यांचा खोळंबा झाल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरुन चालतच कल्याण किंवा ठाकूर्ली स्टेशन गाठले. सकाळी गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.