मुंबई: खडवली स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्यामुळे गुरुवारी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे अप आणि डाऊन दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. या मार्गावरील दोन्ही दिशेच्या गाड्या तब्बल ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या या खोळंब्यामुळे चाकरमन्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी खडवली स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. मात्र, आता बरेच तास उलटूनही रुळ बदलण्याचे काम पूर्ण झालेले नाही. यासाठी आणखी किती अवधी लागेल, याबद्दलही प्रशासनाकडून कोणती माहिती देण्यात आलेली नाही. परिणामी आज दिवसभर मध्य रेल्वेची वाहतूक रखडण्याची शक्यता आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची सध्या प्रचंड गर्दी झाली आहे.


तत्पूर्वी बुधवारीही डोंबिवली येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आज पुन्हा सेवा कोलमडल्यानं प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे.