दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : जयंत पाटील यांनी भूखंड घोटाळ्याचे केलेले आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. हवेली तालुक्यातील ज्या भूखंडाबाबत जयंत पाटील यांनी आरोप केले, त्याबाबत आपण निकाल दिलेलाच नाही. ज्याची जमीन होती, त्याने मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर मला विश्वास नाही, अधिकार बदलावा असा अर्ज केला. मी संबंधित अधिकाऱ्याकडून मोजणी काढून दुसऱ्या अधिकाऱ्याला द्यावी एवढाच निर्णय या प्रकरणात दिला आहे. आता नवा अधिकारी जी मोजणी करेल ती बरोबर आहे की चुक आहे हे जमाबंदी आयुक्त ठरवणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या प्रकरणात बालेवाडी येथील जमीन इनामाची नव्हतीच, ती खाजगी जमीन होती. 1885 साली ब्रिटीशांनी देवस्थानच्या जमिनींची नोंद केली आहे. या जमिनीच्या बाबतीत एका व्यक्तीने फॅमिली ट्रस्ट करून या ट्रस्टच्या नावे जमीन केली. तेव्हा ती जमीन इनामाची लागली. माझ्याकडे हे प्रकरण आले तेव्हा मी 1885 च्या नोंदी तपासल्या, त्यात ही जमीन इनामाची जमीन नव्हती, त्यामुळे या जमिनीला नजराणा लागत नाही आणि ती जमीन खाजगी आहे.
 
'राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतानाही जयंत पाटील त्यांच्या जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा हरल्यामुळे आग लागली, त्याचा धुर इकडे विधानसभेत निघाला आहे. तसंच त्यांच्या वाळवा विधानसभा मतदारसंघात इस्लामपूर नगरपरिषद आम्ही जिंकली, ग्रामपंचायती जिंकल्या, त्यामुळे त्यांची वाळव्यातील जमीन अडचणीत आली आहे. त्यामुळे ते आता हे आरोप करत आहेत. या प्रकरणात थेट उच्च न्यायालयात जायचे असते, विधानसभेत हे उपस्थित करता येत नाही. अर्ध न्यायिक प्रकरणावर या आधी विधानसभेत चर्चा झाल्या असतील, त्या तेव्हाच थांबवायल्या हव्या होत्या. तसंच मला नोटीस न देताच त्यांनी माझ्यावर आरोप केले.' असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.