मुंबई : संक्रांतीच्या निमित्तानं मंत्रिमंडळ बैठकीतही तिळगुळ डिप्लोमसी पाहायला मिळाली. मकर संक्रांतीनिमित्त चंद्रकांत पाटलांनी मंत्रिमंडळ बैठकीत तिळगुळ वाटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनाही यावेळी चंद्रकांत पाटलांनी तिळगुळ दिलं. युतीत गोडवा राहण्यासाठी भाजपकडून शिवसेनेला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. युतीमध्ये स्नेह रहावा असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना तिळगुळ दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेला खूश करण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चा आहेत. भाजपचं सध्या शिवसेनेबाबत मौन आहे. शिवसेनेबद्दल काहीही न बोलण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना अपयशी ठरली असताना देखील भाजपने याबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाही. टीकेची संधी देखील भाजपने सोडली. याआधी भाजप-शिवसेना युतीचा निर्णय मुंबईतच होणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून भाजपवर टीका मात्र सुरुच आहे.


युतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. त्यानंतर युतीचा निर्णय मुंबईत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.