मुंबई : शिवसेना - भाजपचे जागावाटप हे १३५-१३५ असे ठरले आहे, या स्वतःच्याच विधानावरुन भाजपचे नवे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घुमजाव केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्विकारल्यावर पाटील यांनी घुमजाव केले आहे. जागावाटपाबाबात चर्चा करायला बसल्यावर नेमक्या फॉर्म्युलाबाबात ठरवले, जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा भार स्विकारला. यावेळी चंद्रकांत पाटील तसेच मुंबईचे नवे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये युतीच्या जागावाटपाबाबतची भूमिका पाटील यांनी स्पष्ट केली आहे. 


काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणे हेच प्रदेशाध्यक्ष म्हणून आपले  पहिले प्राधान्य असेल. विरोधी पक्षातील जे चांगले नेते भाजपमध्ये येऊ इच्छितात, त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल, असे सांगत विरोधकांना इशारा दिला आहे. काँग्रेसने एक नव्हे, पाच कार्याध्यक्ष नेमले असले तरी येत्या पंधरा दिवसांत काँग्रेसचा त्यापैकी एक कार्याध्यक्ष भाजपमध्ये आला तर आश्चर्य वाटू देऊ नका, असा सूचक इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला. 


निवडणुकीपूर्वी विरोधकांना धक्का देण्याचे सूतोवा चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. विधानसभा निवडणूक पाहता विरोधी पक्षातील चांगल्या नेत्यांना पक्षात प्रवेश देणे आणि पक्ष अधिक मजबूत करून काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणे, यावर आपला भर राहील. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती जिंकण्याचे ध्येय निश्चित केले आहे, असा इशारा त्यांनी शरद पवार यांनाही दिला.