मुंबई : कर्जमाफी निकषांवर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. बुधवारी मातोश्रीवर जाऊन ते उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. कर्जमाफीची कोंडी फोडण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी आघाडी घेतलीय. यानंतर ते शरद पवारांचीही भेट घेणार आहेत. याआधी त्यांनी रामदास कदम, दिवाकर रावते, धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील आणि राजू शेट्टी यांच्याशीही चर्चा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान राज्यातील आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक तसंच जिल्हा परिषद सदस्य 10 हजार रूपयांच्या तातडीच्या कर्जासाठी अपात्र असतील, अशा आशयाचा नवा जीआर लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे 5 लाख रूपयांपर्यंत आयकर भरणा-या सर्वांनाच 10 हजार रूपयांचं हे कर्ज उपलब्ध होणार आहे. मात्र 5 लाखांवर उत्पन्न असणा-या कुणालाही हे कर्ज मिळणार नाही, असा सुधारित जीआर काढण्यात येणार असल्याचं समजतंय.


मर्यादित थकबाकी असलेल्या शेतक-यांनाच कर्जमाफी देण्याची सरकारची भूमिका आम्हाला मान्य नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. कर्जमाफीबाबत कोणते निकष शिथील केले, ते नव्या जीआरमध्ये स्पष्ट झाल्याशिवाय स्वागत करणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.