पूरग्रस्त कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी चंद्रकांत पाटलांचा पुढाकार
पूर ओसरला असला तरी संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे.
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: सांगली आणि कोल्हापूरसह पूरबाधित भागातील यावर्षी होणाऱ्या मुलींचे विवाह करण्यास सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी पूरग्रस्त कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आपण मदत करणार असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे पूरग्रस्त भागातील जनतेला दिलासा मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.
सांगली कोल्हापूरमध्ये गेल्या महिन्यात पावसाने थैमान घातले होते. याठिकाणी आलेल्या पूरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले. आता पूर ओसरला असला तरी संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे.
दरम्यान, अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा आणि सर्वस्व गमावलेल्या पालकांसमोर आपल्या मुलींचे विवाह कसे करायचे, असा प्रश्नही निर्माण झाला होता. ही समस्या नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता या मुलींच्या विवाहाची जबाबदारी आपण उचलू असे सांगितले.
मंदिरेही नव्याने बांधणार
सांगली कोल्हापूरसह इतर पूरग्रस्त भागातील क्षतिग्रस्त झालेल्या मंदिरांची दुरुस्ती तसेच संपूर्ण उध्वस्त झालेल्या मंदिरांची आवश्यकता भासल्यास पुनर्बांधणी करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थानाचे अध्यक्ष महेश जाधव यांनी या मंदिरांचे दुरुस्ती व पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्ती खेळण्यासाठी बांधलेल्या तालमी सुद्धा या महापुरात उध्वस्त झाल्या असून या तालमी भोसरी येथील आमदार महेश लांडगे यांनी पुन्हा उभ्या करून देण्याचा निर्धार केला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.