मुंबई : मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाचं नाव बदलण्याच्या हालचाली राज्यातील भाजप सरकारनं सुरू केल्यात. तशी मागणी लवकरच केंद्र सरकारकडं केली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतले भाजप आमदार राज पुरोहित यांनी गेटवे ऑफ इंडियाचं नाव बदलण्याची मागणी राज्य सरकारकडं केलीय. गेटवे ऑफ इंडिया हे ब्रिटीशकालिन नाव असून, त्यामुळं देशभक्तीच्या भावनेला तडा जातो. त्यामुळं भारतद्वार असं त्याचं नामकरण करावं, अशी मागणी त्यांनी केलीय.


दक्षिण मुंबईत अरबी समुद्राच्या किना-यावर गेटवे ऑफ इंडियाची वास्तू दिमाखात उभी आहे. मुंबई दौ-यावर आलेला प्रत्येक पर्यटक गेटवे ऑफ इंडिया पाहिल्याशिवाय परतत नाही. ब्रिटिश राजे जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या स्वागतासाठी 20 व्या शतकात ब्रिटिशांनी ही भव्य कमान उभारली.


1924 मध्ये गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम पूर्ण झालं. मुंबईत ब्रिटीश काळातल्या अशा असंख्य वास्तू अजूनही डौलात उभ्या आहेत. यापैकी अनेकांची नाव तशीच कायम आहेत. मात्र भाजप आमदारानं मागणी केल्यानंतर, नाव बदलण्याची शिफारस राज्य सरकार केंद्राकडं करणार आहे.


केवळ गेटवे ऑफ इंडियाच नव्हे, तर अनेक ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलण्यासाठी आमदार पुरोहित आग्रही आहेत. मरीनलाइन्स, ग्रँट रोड, परेल अशा रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याची मागणी त्यांनी केलीय. त्यांचा हा आग्रह निरर्थक असल्याची टीका इतिहासतज्ज्ञांनी तसंच विरोधकांनीही केली आहे.