`बड्या माशां`साठी मुंबईच्या विकास आराखड्यात फेरफार
एका हॉटेलसाठी आणि एका बड्या बिल्डरसाठी शासनाने हा प्रताप केल्याचा आरोप स्थानिक कोळी बांधवांनी केलाय.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील मालाड इथल्या मढजवळील सिल्वर बीचवर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी गार्डन आणि पार्कचे आरक्षण टाकण्याचा प्रताप केलाय. सिल्वर बीचवरील ही जागा राज्य सरकारनेच १९८३ साली इथल्या भाटी कोळीवाड्यातील मच्छिमारांसाठी मासळी वाळवण्यासाठी आरक्षित केली होती. मात्र ना विकास क्षेत्रात असलेली २२ एकरची जागा मुंबईच्या नव्या विकास आराखड्यात गार्डन आणि पार्कसाठी आरक्षित करण्यात आली आहे. इथं उभ्या असलेल्या एका हॉटेलसाठी आणि एका बड्या बिल्डरसाठी शासनाने हा प्रताप केल्याचा आरोप स्थानिक कोळी बांधवांनी केलाय.
भाटी कोळीवाडा संकटात
मुंबईचा झपाट्याने विकास होत गेला तसे या विकासात इथले मूळ कोळीवाडे नष्ट होऊ लागले. मात्र काही कोळीवाडे अजूनही आपलं अस्तित्व टिकवून आहेत. मालाड रेल्वे स्टेशनपासून १० किलोमीटर अंतरावर मढ येथे असलेला त्यापैंकीच एक भाटी कोळीवाडा... मात्र आता भाटी कोळीवाड्यावरही संकटाची कुऱ्हाड लटकत आहे. मासेमारी हा मुख्य व्यवसाय असलेले भाटी कोळीवाड्यातील कोळी बांधव कोळीवाड्यालगत असलेल्या एरंगल येथील सिल्वर बीचवर पिढ्यानं पिढ्या मासे सुकवण्याचं काम करतात. २२ एकरचा हा परिसर आहे. सरकारनंही ही जागा कोळी बांधवांसाठी १९८३ साली मासळी व जाळी सुकवण्यासाठी राखून ठेवली आहे.
भाटी कोळीवाड्यातील कोळी बांधवांची मासळी सुकवण्याची ही जागा यापूर्वीही त्यांच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न झाला होता. २००४ साली इथे असलेल्या बंगल्यांच्या मालकांनी बीचवर मासळी सुकवण्यास मज्जाव करावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने या प्रकरणात कोणतेही आदेश देण्यास नकार देत संबंधित यंत्रणेवर निर्णयाची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार महसूल विभागाने कोळी बांधवांचे या जागेवर मासळी आणि जाळी सुकवण्याचे हक्क कायम ठेवले होते. आता पुन्हा एकदा मुंबई विकास आराखड्याच्या आडून कोळी बांधवांना उद्धवस्त करण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय.
कोळीबांधव उद्धवस्त होणार?
भाटी कोळीवाड्याची स्मशानभूमीही याच भागात आहे. प्रस्तावित गार्डन आणि पार्कमध्ये स्मशानभूमीचाही समावेश आहे. दुसरीकडे राज्य सरकारने मासळी सुकवण्याच्या या जागेवर गार्डन आणि पार्क प्रस्तावित केलं असलं तरी कोळी बांधव ही जागा सोडायला तयार नाहीत.
काही धनदांडग्यांच्या हौसे आणि मौजेपोटी मासळी सुकवण्याची ही जागा भाटी कोळीवाड्यातील कोळी बांधवांपासून हिरावून घेण्यासाठी बीचवरच चक्क गार्डन आणि पार्कचं आरक्षण प्रस्तावित करण्यात आलं आहे. ही जागा जर कोळी बांधवांच्या हातून गेली तर मुंबईतील इतर कोळी बांधवांप्रमाणे भाटी कोळीवाड्यातील कोळीबांधवही उद्धवस्त होण्यावाचून राहणार नाहीत. त्यामुळे स्थानिकांच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना आणि राज्य सरकारनेही मुंबईतून कोळी बांधवांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं पाहिजे.