दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाविकासआघाडीमधल्या प्रशासकीय बदल्यांमधील गोंधळ पुन्हा उघड झाला आहे. दोन महिन्यांच्या आत दोन सनदी अधिकाऱ्यांची दोनदा बदली करण्यात आली आहे. अनुप कुमार यादव यांची अवघ्या २० दिवसांमध्ये दुसऱ्यांदा बदली झाली आहे. २३ जुलै रोजी अनुप कुमार यादव यांची आरोग्य खात्यातून विक्रीकर विभागात बदली झाली होती. तर आज म्हणजेच १३ ऑगस्ट रोजी त्यांची पुन्हा विक्रीकर विभागातून आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर विनिता सिंघल यांची २० जून रोजी फिल्म सिटीमधून आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली होती. त्यानंतर २ महिन्यांच्या आत त्यांची बदली कामगार विभागात झाली. याआधी मुंबईतल्या १० पोलीस उपायुक्तांच्या गृहखात्याने केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांमध्ये रद्द केल्या होत्या. 


पोलिसांच्या बदल्या रद्द केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. तर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनाही मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर भेटायला बोलावलं होतं.