मुंबई दंगलीत प्राण वाचवणाऱ्या मुस्लिम कुटुंबासोबत शेफची इफ्तारी
पुन्हा एकदा शेफ विकास खन्नाने मन जिंकल
मुंबई : माणुसकीशिवाय दुसरा कोणता धर्म नाही. संकट समयी एखाद्याने माणुसकीच्या नात्याने केलेली मदत ही कायम स्मरणात राहते. आणि त्या मदतीचे आपण आयुष्यभर ऋणी राहतो. शेफ विकास खन्ना याच्या बाबतीत देखील असंच काहीस झालं आहे. 1992 मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीत एका मुस्लिम कुटुंबाने त्याला आसरा दिला होता. आणि याच उपकाराची जाण ठेवत शेफ विकास देवाशी प्रार्थना करत त्या कुटुंबासाठी रमजानमध्ये रोझा ठेवतो.
दंगलीच्या 26 वर्षानंतर कृतज्ञतेपोटी शेफ विकासने त्या कुटुंबाला शोधून काढलं आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणारा शेफ विकास याने सांगितले की, या मुस्लिम कुटुंबासोबत त्यांचा संपर्क तुटला होता. मात्र त्याने त्या कुटुंबाला पुन्हा शोधून काढलं आहे. शेफ विकासने ट्विट करताना म्हटलंय की, पुन्हा एकदा या कुटुंबाला शोधण्यात मला यश मिळालं आहे. तसेच रमजानमध्ये या कुटुंबाच्या कृतज्ञेपोटी ठेवलेला रोजा या परिवारासोबतच सोडणार आहे. मुंबईतील या कुटुंबासोबत इफ्तारी केल्यानंतर त्याने ट्विट केलं आहे.
शेफ विकास खन्ना दिली ही माहिती
1992 च्या दरम्यान विकास खन्ना एका हॉटेलच्या किचनमध्ये ट्रेनिंग घेत होता. तेव्हा संपूर्ण शहरात दंगल पेटली होती. कर्फ्यू लावलेल्या या शहरात तो अनेक दिवस त्याच हॉटेलमध्ये राहिला होता. मुंबईच्या घाटकोपर परिसरात दंगलीने रूद्र रुप धारण केलं आहे, असं त्याने ऐकलं. त्यावेळी त्याला आपल्या भावाबद्दल चिंता वाटू लागली. तेव्हा तो घाबरून भावाला भेटण्यासाठी निघाला. पण तेव्हा एका मुस्लिम कुटुंबियांनी त्याला सावध केलं. आणि घरात घेतलं. त्याचवेळी दंगल करणाऱ्या लोकांनी हा मुलगा कोण असं त्या कुटुंबियांना विचारलं तर तेव्हा त्यांनी हा आपला मुलगा असल्याचं सांगून त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर या मुस्लिम कुटुंबानेच त्याला त्याचा भाऊ शोधण्यास मदत केली. विकास काही दिवस त्यांच्याकडेच राहिला. फेसबुक पोस्टनुसार विकास दरवर्षी या मदत करणाऱ्या मुस्लिम परिवारासाठी रमजानच्या महिन्यातील एक दिवस रोजा ठेवतो.