मुंबई : चेंबुरच्या टिळकनगरमधील सरगम सोसायटीत लागलेल्या आगीत 5 जणांचे बळी गेले. एसी सिलिंडरचा स्फोट झाल्याने 14 व्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर हा विदारक प्रकार समोर आला. पण घटनेमागचे आणखी एक धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे.पार्किंगची जागा पुरेशी नसल्याने अनेक रहिवासी इमारतीजवळच्या रस्त्यावर वाहने लावतात. त्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचा बंब यांना इमारतीच्या जवळ जाताच आले नाही. याप्रकरणी सरगम सोसायटीच्या बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 148 फ्लॅट असलेल्या सरगम सोसायटीमध्ये केवळ 60 गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था आहे. त्यामुळे वाहनांचा ताण इमारतीखालच्या जागेवर पडत होता. अशावेळी रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या अतिमहत्त्वाच्या गाड्यांना आत येणेही मुश्किल होते. गुरुवारच्या दुर्घटनेवेळीही नेमके तेच झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमारतीमध्ये अग्निशमन नियमांचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. इमारतीखाली रिकामी जागेत दुचाकी आणि कार असल्याने अग्निशमन दलाची गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. पार्किंमधील गाड्या काढण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे आगीपर्यंत पोहोचण्यास विलंब झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. '2014 मध्ये म्हाडाने या इमारतीचे पुनर्वसन केले होते. या घटनेची संपूर्ण चौकशी आणि पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे' पालिकेच्या एम पश्चिम वार्डचे सहाय्यक आयुक्त पी. चौहान यांनी सांगितले. इमारतीच्या प्रवेश द्वारापर्यंत गाड्या पार्किंग केल्या गेल्या होत्या. रहिवाशी बाहेर आले आणि त्यांनी गाड्या बाहेर काढण्यास सुरूवात केल्याचे अतिरीक्त उपायुक्त पी.जी दुधाळ यांनी सांगितले. इमारतीची अग्निशमन यंत्रणा ही पाण्याच्या टाकीशी संलग्न नव्हती. आम्ही स्वखर्चाने ही यंत्रणा बसवल्याचे रहिवाशांनी सांगितले. 


गुन्हा दाखल 


इमारतीच्या सचिवांच्या तक्रारीवरून हेमेंद्र मापरा, सुभक मापरा आणि कोठारी यांच्याविरोधात आयपीसी कलम 304(2), 336, 427,34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.