मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे त्यांच्या 'सिल्व्हर ओक' या बंगल्यावर दाखल झालेत. मला जामीन मिळाला त्यावेळी पहिला  फोन हा  शरद पवार यांचाच झाला, अशी माहिती भुजबळ यांनी दिली होती. तसेच पडत्या काळात ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्याचे आभार भुजबळ यांनी मानले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी भुजबळ पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी दाखल झाले. जामिनावर तुरुंगाबाहेर आल्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट आहे.


भुजबळ हे आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरुन पवारांच्या भेटीसाठी गेले. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली आहे. दरम्यान, छनग भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतरही ते रुग्णालयातच होते. त्यांना रुग्णालयातून काल डिस्चार्ज मिळाला होता. आज ते पवारांच्या भेटीला गेलेत. तसेच त्याआधी मुलगा पंकज भुजबळ याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. भुजबळांचा भेटीचा सिलसिला कायम दिसून येत आहे. आज शरद पवार यांची भेट होत आहे.