मुंबई : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली असली तरी राज ठाकरे समजदार आहेत, असं मत अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या अयोध्या भेटीमुळे महाविकास आघाडी सरकारवर काहीच परिणाम होणार नाही, असा दावा देखील भुजबळांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे आणि मिलिंद एकबोटे यांच्या भेटीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य करत, राज ठाकरे हे राजकारणी असल्याने त्यांना कोणालाही भेटण्याचा हक्क आहे. मात्र, आपण काय भूमिका घेत आहोत, हे कळण्याइतकी समज त्यांच्याकडे आहे. त्यांनी प्रबोधनकारांची शिकवण लक्षात ठेवावी, असं भुजबळ यांनी म्हटलंय. 


राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मिलिंद एकबोटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेणे स्वागतार्ह आहे. त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे, असे एकबोटे यांनी म्हटले. 


 


कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या २४ तारखेला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रूक याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते कृष्णकुंज येथे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकबोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.