मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये, गोव्यावरुन थेट मंत्रालयात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक
मुंबई : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. काल शपथविधी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळाची पहिली बैठक (Cabinet Meeting) घेतली. यात राज्यातील पीक-पाण्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर रात्री ते गोव्याला रवाना झाले.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्यावरुन मुंबईत परतले आणि त्यांनी थेट मंत्रालय गाठलं. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली आहे. मुंबई, कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस पडतोय. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थानन विभागाच्या बैठकीत मुंबई आणि राज्यातील पावसाचा आढावा ते घेतील.
पुढील तीन ते चार तासांत मुंबई सह ठाणे, रायगडमध्ये आणि पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलं आहे. सततच्या पावसामुळे मुंबईसह उपनगरात पाणी साचलं आहे. या परिस्थितीचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. याबैठकीला उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित रहाणार आहेत.
मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच आढावा बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.