मुंबई : Eknath Shinde on Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या राज्यात सत्तापरिवर्तन होणार, या वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत सत्तांतराचं स्वप्न पाहतायत, त्यांना स्वप्नातच राहू द्या, असं प्रत्युत्तर दिले आहे. तर उणीदुणी काढण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदत करा, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राऊतांना लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत.  महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल, असं भाकीत केले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना म्हटले, संजय राऊत यांना स्वप्नातच राहू द्या.  एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार फुटलेत. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावर  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला असून राज्यात सत्ता परीवर्तन निश्चित आहे, असे प्रतिपादन केले. अनेक आमदार भावनेच्या भरात शिंदे गटात गेले आहेत. 16 आमदार अपात्र ठरणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.



अनेक आमदार-खासदार मानसिकरित्या सध्याच्या सरकार सोबत नाहीत. ते संभ्रमावस्थेत आहेत. आज गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात असून, भविष्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको. राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन होणार, असे भाकित राऊत यांनी केले आहे. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे राऊत म्हणाले.