Maharashtra Politics : राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांवरून आणि ओल्या दुष्काळावरून राज्य सरकारवर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) जोरदार टीका होत आहे. या टीकेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे. आपण सर्वांना कामाला लावलं, सरकारमध्ये असलेल्या आणि बाकी लोकांना पण, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच येत्या काळात राज्यात मोठे उद्योग येतील, आरोपांना कामानं उत्तर देऊ, असंही शिंदे म्हणाले. आज मुख्यमंत्र्यांनी नंदुरबारचा दौरा केला. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार पालिकेला 7 कोटींचा निधी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न
टाटा एअरबस (Tata-Airbus project) प्रकल्पावरुन राज्यात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, योग्य वेळेला याची उत्तरं देईन, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यातील तरुणांना रोजगार द्यायचा आहे, भविष्यात राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान मोदी यांनीही महाराष्ट्रात उद्योग देण्याचं आश्वासन दिलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. युती काळात जे प्रकल्प सुरु करण्यात आले, त्या प्रकल्पांना मविआ सरकारच्या काळात स्थगिती देण्यात आली, ते प्रकल्प पुन्हा सुरु केले अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.


शेतकऱ्यांना आर्थिक मदत
राज्यातील शेतकऱ्यांचं परतीच्या पावसाने मोठं नुकसान झालं आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही जी नुकसान भरपाई दिली, ती आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी नुकसान भरपाई आहे, नियम डावलून शेतकऱ्यांना मदत केली, त्यामुळे आकडे पहावे आणि टीका करावी असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं.


आदित्य ठाकरे यांची टीका
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री टाटांना भेटायला गेले होते. मग या भेटीत काय गुजरातला प्रकल्प पाठवण्याबाबत चर्चा झाली होती का? असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. तसंच लवकरच केंद्राच्या मदतीनं मोठा प्रकल्प राज्यात येणार असल्याचं सांगणाऱ्या उद्योगमंत्र्यांनी आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कृषी मंत्री सत्तारांचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय.