मुंबई : मुंबईतल्या २ वर्षांपासून रखडलेल्या लोअर परेल पुलाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमीपूजन झालं आहे. गेल्या २ वर्षांपासून रखडलेल्या लोअर परळच्या पुलाचं काम अखेर सुरू होतं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज डिलाईल रोड इथे पुलाचं भूमीपूजन केलं. त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अनिल देसाई, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. ६०० मी. लांबीच्या या पुलाचं काम १८ महिन्यात पूर्ण होणार असल्याचं बोललं जात आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याशिवाय संत गाडगे महाराज चौक सातरस्ता या ठिकाणी दोन पुलांचं भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. केशवराव खाड्ये मार्गावर हाजी अलीच्‍या दिशेने जाणाऱ्या आणि संत गाडगे महाराज चौक सातरस्ता इथून धोबी घाटमार्गे डॉ. ई. मोजेस मार्ग येथे म्हणजे वरळी नाका दिशेनेदेखील पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 



दोन्ही प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे. यावेळी मुंबईत पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर भर देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली.


याशिवाय त्यांनी, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आधुनिक प्रदर्शन कक्षाचं लोकार्पण केलं. भक्तीपार्क उद्यान येथील मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा शुभारंभ देखील केला.