मुंबई  ST employees strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी सुरु असलेला संप आता चिघळत चालला आहे. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजु होण्याचे निर्देश दिल्यानंतरही संप सुरुच आहे. त्यातच राज्य सरकारने 376 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलल्याने कामगारांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊलं उचलत आहोत ते सांगितलं असून न्यायालयाचं देखील समाधान झालं आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.  
 
अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा  मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.