मुंबई :  मुंबईत मोठ्या प्रमाणात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याची काही व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मांडली होती. पण अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध करत सध्या सीमा शिथिल करता येणार नाही, अशी भूमिका घेतल्यानं या कामगारांनी आहे तिथेच थांबावे असा निर्णय झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज २१ दिवसांचं लॉकडाऊन संपेल आणि आपल्या गावी परत जाता येईल अशी मुंबईत अडकून पडलेल्या मजुरांची अपेक्षा होती. त्यामुळे गावी जाण्याच्या ते तयारीत होते. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आदी राज्यातील हे मजूर आहेत. एकाच ठिकाणी अडकून पडल्यानं त्यांना घरी जायचं आहे. आज लॉकडाऊन उठलं तर परत जाण्याची तयारी त्यांनी केली होती. पण लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानं त्यांना परत पाठवणं शक्य नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय.


 



पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत नेमकं काय झालं याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याबाबत काही व्यवस्था करता येईल का याबाबत विचारणा केली होती. पण अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सीमा शिथिल करता येणार नाही अशी भूमिका घेतली. एकूण परिस्थिती पाहता मजुरांना आहे तिथेच थांबवावे असा निर्णय त्यावेळी झाला.