मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या वांद्रे-वर्सोवा (Bandra-Versova) सी लिंक आणि वर्सोवा-विरार सी लिंक (Versova-Virar sea bridge route) या दोन प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी आढावा घेतला. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच प्रवास सुखकर होण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे असून त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्यावतीने वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत या दोन प्रकल्पांचे सादरीकरण मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर करण्यात आले. वांद्रे वर्सोवा हा सी लिंक हा 9.6 किमी असून या मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटून इंधनाची बचत होणार आहे. तसेच प्रवासाचा वेळ वाचणार आहे. हा सागरी महामार्ग सन 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जुहू कोळीवाडा बाह्य मार्ग  आणि वर्सोवा येथून पुढे हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडण्याची सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केली.



वर्सोवा-विरार या सुमारे 42.75 किमी लांबीच्या सागरी मार्गाचा पूर्व सुसाध्यता अहवाल पूर्ण करण्यात आला आहे. वर्सोवा ते वसई आणि वसई ते विरार या दोन टप्प्यात या प्रकल्पाचे काम होणार आहे. सागरी किनाऱ्याला समांतर असणाऱ्या या सागरी सेतूमुळे वर्सोवा ते विरार या मार्गावरील वाहतूक वेगवान होणार आहे. हा सागरी मार्ग बांधताना पर्यावरणविषयक सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला असून मच्छिमारांच्या हालचालींना हानी पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. चार ठिकाणी मच्छिमार नौका व इतर नौकांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी नेव्हिगेशन स्पॅन देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


वर्सोवा –विरार सागरी सेतू मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा. या दोन्ही सागरी सेतू मार्गामुळे या भागातील अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार असून रोजगार संधी वाढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.