मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. मराठा आरक्षण, ईडीची कारवाई, (ED Enquiry) हिंदुत्व (Hindu) यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांत शाब्दिक चकमक दिसून आली. अभिनेत्री कंगना रानौत, अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाई आणि ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक  (Pratap Sarnaik) यांच्यावर टाकलेले छापे यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यामध्ये जुंपली. दरम्यान, विधीमंडळाचे कामकाज स्थगित झाले असून पुढील अधिवेशन १ मार्च रोजी २०२१ रोजी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन-२०२० आज संस्थगित झाले. हिवाळी अधिवेशन -२०२० या दोन दिवसांच्या अधिवेशनात एकूण  ११ विधेयके मांडण्यात आली. दोन्ही सभागृहात नऊ विधेयके  संमत झालीत. तर विधान सभेत एक प्रलंबित विधेयक आहे. तर विधान परिषदेत एकही प्रलंबित विधेयक नाही. तसेच संयुक्त समितीकडे एक विधेयक पाठविण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात विरोधात बोलणाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी प्रताप सरनाईकांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख केला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी सरकारची ठोकशाही असल्याचा पुनरूच्चार केला. 


राज्य सरकारविरोधात काही बोलले तर तुरुंगात टाकले जाते, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप आमच्यावर झाला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता केला. आज आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. राजकीय मार्ग बदलण्यासाठी वापर करत आहात. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब त्यांना नातू झालेला नाही नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी सभागृहात लगावला.


उद्या हे सांगतीलही की प्रताप सरनाईक यांना नातू झाला तर आधी इथे घेऊन या. हे सगळं काय आहे? ही विकृतीच आहे. असे विकृत राजकारण आम्ही करत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत. ही चांगली गोष्ट आहे, असा टोला मुख्यमंत्री  ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचे संदर्भ  फडणवीस यांनी दिले होते. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला.