मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्या अयोध्या दौरा
कोरोनाच्या सावटाखाली कसा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा?
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. उद्धव ठाकरे शनिवारी सहकुटुंब अयोध्येला जाणार आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्यावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात बरेच बदल करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या सावटाखाली कसा असणार उद्धव ठाकरेंचा दौरा -
सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री मुंबई विमानतळावरुन अयोध्येसाठी निघतील. सकाळी ११ वाजता ते लखनऊमध्ये पोहोचतील. अयोध्येतल्या पंचशील हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील. दुपारी ४ वाजता ते रामजन्मभूमीकडे निघतील. त्यानंतर ४.३०च्या सुमारास ते रामजन्मभूमी आणि रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर, साडे पाचच्या सुमाराला मुख्यमंत्र्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल.
महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचं सावट असल्याने यावेळी शरयू आरती होणार नाही.
याआधी नोव्हेंबर २०१८ मध्ये राममंदिराचा निकाल येण्याआधी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच अयोध्येला जाणार आहेत. महाविकासआघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधत उद्धव ठाकरेंचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही, हा संदेश अयोध्या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री पुन्हा एकदा देणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी निरनिराळ्या घोषणा केल्या.
अर्थसंकल्पात सर्वच विभागाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. पायाभूत सुविधांपासून रोजगार निर्मिती, तरुणांना रोजगार मिळण्यासाठी कायदा, रस्ते विकासाबरोबरच पर्यटन व्यवसाय वाढीला लागण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्माण होईल, अशा आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांसह एसटीला नवी गती मिळण्यासाठी प्राधान्य, शिक्षण, आरोग्य विषय सुविधांवर मोठा भर देण्यात आला आहे. तसेच पर्यटन आणि मासेमारी व्यवसाय, फळ प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.