मुंबई : आज हा विजयी सोहळा होत आहे. त्याचे साक्षीदार आपण आहात. तुमचे अनेक उपकार आहेत. हा माझा सत्कार नाही तर तो आपल्या सगळ्यांचा आहे. मी निमित्त आहे. मी बाळासाहेबांना शब्द दिला होता. त्यामुळे आपले सरकार आले आहे. मी मुख्यमंत्री होईन, असा शब्द दिला नव्हता. माझ्यावर जबाबदारी आली आहे. ही जबाबदारी स्विकारली आहे. वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. आमच्या त्या मित्राने दिलेले वचन मोडले. बाळासाहेबांच्या मंदिरात वचन दिले ते पाळले नाही.  मी खोटे बोलणार नाही, म्हणून मी वेगळा मार्ग स्विकारला. मला खोटं पाडण्याचे प्रयत्न झाले. मात्र, तुमच्या विश्वासाला कधीही तडा दिला जाणार नाही. मी मरण पत्करेन पण खोटे कधीही बोलणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

११ ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शिवसैनिकांनी तलवार भेट दिली. यावेळी ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.  या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार  मंत्री आदित्य ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला. शिवसेनेतील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर सगळ्यांना मंचावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. या सत्कार सोहळ्याच्या वेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.


यावेळी उद्धव यांनी भाजपला जोरदार टोला लगावला. शिवसेनेचा रंग भगवाच आहे.  शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला, अशी टीका झाली. मात्र मला आज त्यांना (भाजप) विचारायचे आहे की, तुमचं काय काय उघड झाले? युती तर तुम्ही २०१४ लाच तोडली होती आणि आज आम्हाला नावे ठेवत आहात, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.




मी डरणारा नाही तर मी लढणारा आहे, हे लक्षात असूद्या. मी वेगळा मार्ग स्वीकारला कारण,  मला खोटे पाडण्याचा प्रयत्न झाला. तेव्हाच्या मित्रपक्षाने मला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेला फसवण्याचा प्रयत्न झाला. २०१४ मध्ये तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन केली. मी जी जबाबदारी स्वीकारली होती ती माझ्या स्वप्नातही नव्हती. आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, आमचे अंतरंग भगवेच आहे, असे उद्धव  यावेळी म्हणालेत.