सुस्मिता भदाणे, मुंबई : मोबाईल फोनमुळं मुलांचं बालपणच हरवून जातंय. मैदानावरच्या खेळात धुळीनं माखणारे नाजूक हात, सध्या मोबाईल गेम्स खेळण्यात गुंग आहेत. अशावेळी फ्रान्स सरकारनं घातलेला मोबाईल बंदीसारखा उपाय हितकारक ठरू शकतो का...?. शाळांना सुट्टी पडली की, मुलं खेळांच्या मैदानात तुटून पडायची. झुकझुग आगीनगाडीत बसून मामाच्या गावाला फिरायला जायची. पण गेल्या काही वर्षांत हे चित्रच पालटून गेलंय. मुलं मैदानात कमी आणि मोबाईल फोनवर जास्त दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तंत्रज्ञानरूपी राक्षसानं त्यांचं कोवळं बालपणच खाऊन टाकलंय... शाळेत जाणाऱ्या मुलांकडून मोबाईलचा अतिवापर ही मोठी समस्या बनलीय... मोबाईलपासून मुलांना दूर ठेवणं, हे पालक आणि शिक्षकांसाठी फार कठीण बनलंय. मध्यंतरी शिक्षणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेनं आठवीतल्या मुलांना टॅब उपलब्ध करून दिले. पण त्याची अभ्यासासाठी मदत तर झाली नाहीच... उलट मुलांनी या टॅबचा वापर गेम्स खेळण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी आणि नको नको ते व्हिडिओ पाहण्यासाठीच केला.


सध्याच्या माहितीच्या जगात मुलांनी स्मार्ट अभ्यास करावा, म्हणून शालेय पाठ्यपुस्तक मंडळानं इंटरनेटवर पुस्तक उपलब्ध करून दिलीत. पण यामुळं मोबाईल व्यसन आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. अनेक पालकांनी सुरूवातीला विरंगुळा म्हणून किंवा मुलांच्या कटकटीतून थोडी मोकळीक मिळावी म्हणून मुलांना मोबाईल उपलब्ध करून दिला. पण आता मुलांना त्याचं व्यसनच लागलं असून, कधी एकदा पालकांचा फोन हातात पडतो, याकडं मुलं आशाळभूतपणं नजरेनं पाहत असतात.


अनेक १२ वर्षांखालील मुलांना सध्या फँटम फोनचा आजार जडलाय. मोबाईलची रिंग वाजत असल्याचा भास त्यांना सतत होत असतो. ऑनलाइन मित्रांच्या शोधत असलेली मुलं जवळचे मित्र हरवून बसत असल्यानं एकलकोंडी होतायत... शिवाय मोबाईलच्या व्यसनामुळं मुलांचं अभ्यासावरच लक्ष उडालं असून, मुलांना अपयश येण्याचं प्रमाण वाढलंय.