चोटी गँगची वसईमध्येही दहशत, दहावीतल्या मुलीची वेणी कापली
सध्या देशभरात धुमाकूळ घालणा-या चोटी गँगची दहशत आता वसई तालुक्यातही पसरलीय
प्रवीण नलावडे, झी मीडिया, वसई : सध्या देशभरात धुमाकूळ घालणा-या चोटी गँगची दहशत आता वसई तालुक्यातही पसरलीय. नालासोपा-यात आचोळे डोंगरी भागात दहावीत शिकणा-या मुलीची वेणी मध्यरात्री कुणीतरी कापून टाकली, त्यामुळे या परिसरात घबराट पसरलीय.
दहावीत शिकणारी अंगुली यादव पहाटे तीन वाजता अभ्यास करण्यासाठी उठली. घराचा दरवाजा उघडून तोंड धुण्यासाठी ती बाहेर पडली आणि अचानक तिचा मोठा ओरडण्याचा आवाज आला. घरातली मंडळी धावत बाहेर आली. तेव्हा कुणीतरी अंगुलीची केसाची वेणी कापल्याचं लक्षात आलं. या प्रकारामुळे सगळेच घाबरून गेलेत. पण हे केस कुणी कापले, याचा उलगडा अजून होऊ शकलेला नाही.
सध्या देशाच्या विविध भागात चोटी म्हणजे केसाची वेणी कापणारी गँग धुमाकूळ घालतेय. तिचं लोण वसईत पसरलंय की काय, अशी भीती सगळ्यांना वाटतेय. यानिमित्तानं अनेक अफवा देखील पसरल्यात. चोटी गॅंग कधीही येते आणि मुलींचे केस कापते. अगदी मांजर कातर घेऊन येते आणि केस कापून जाते, असं बोललं जातंय.
घराच्या दारावर लिंबू, कडु लिंबाचा पाला बांधला, मुलींच्या महिलांच्या पायाला लाल कलर लावला तर ही गॅंग येत नाही, अशा एक ना अनेक अफवांचं पेव फुटलंय. चोटी गँगच्या दहशतीनं लहान मोठ्या मुली दहशतखाली वावरतायत. चोटी गँगपासून वाचण्यासाठी काही जणी तर डोक्याला चक्क कपडा बांधूनच घराबाहेर पडतायत. हे चोटी गँगचं गूढ कधी उकलणार, याकडं आता सर्वाचं लक्ष लागलंय.