स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईत शहर वसवणाऱ्या सिडकोने सर्वप्रथम वाशी शहरात निवासी गृहप्रकल्प राबवले. यात जेएन १, २, ३, ४ अशा प्रकारात घरं तयार करण्यात आली. १९८४ साली ही जवळपास पाच हजार घरं उभी करण्यात आली. मात्र अवघ्या १० वर्षात ही घरं निकृष्ट असल्याचं उघड झालं आहे. यातल्या जे एन २ टाईप घरांत छत कोसळणे, प्लास्टर पडणे या घटना घडल्या आहेत. यातल्या काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर अनेक कुटुंब आजही या धोकादायक घरांमध्ये जीव मुठीत धरून राहात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिडकोच्या निवासी गृहप्रकल्पांची दूरवस्था


जेएन २ टाईपमधील श्रद्धा अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनमध्ये २३ इमारती आहेत. त्यात २६७ कुटुंब वास्तव्याला आहेत. २३ इमारतींपैकी ७ इमारती धोकादायक म्हणून १९९८ साली सिडकोने रिकाम्या केल्या. त्या बदल्यात या घरातील कुटुंबांना सिडकोकडून जुईनगर इथल्या घरांमध्ये तात्पुरता निवारा देण्यात आला. मात्र गेली २० वर्षे ही कुटुंब या तात्पुरत्या घरांमध्ये राहात आहेत. रिकाम्या केलेल्या त्या सात इमारती अजूनही दुरूस्त अथवा पुनर्विकसीत करण्यात आलेल्या नाहीत.


हजारो निकृष्ट घरांत नागरिक जीव मुठीत धरून


निकृष्ट इमारतींचा पुनर्विकास करता यावा यासाठी अडीच एफएसआय दिलाय. मात्र तरीही नागरिक हतबल आहेत. बहुतांश इमारती सिडकोने पुन्हा बांधून द्याव्या अशी नागरिकांची मागणी आहे. पण सिडको हे करण्यास तयार नाही. तसंच बिल्डर आणि राजकारणी यांच्या दबावाखाली नागरिकही इमारती बांधण्यास तयार नाहीत.


शासनाने सिडकोच्या या घरांना अडीच एफएसआय देऊ केलाय. पण यासाठी १५ मीटरचा रस्ता असणं बंधनकारक आहे. यामुळे अडीच एफएसवाय वापरणं शक्य होणार नाही. नियमात बसवून इमारत बांधण्याची परवानगी मागितल्यास मनपा प्रशासन परवानगी देण्यास तयार आहे. मात्र इमारत बांधताना कुटुंबांना स्थलांतरासाठी ट्रान्झीट कँप देण्यात येणार नाही असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.


हजारो कुटुंबांचा वाली कोण?


स्थानिक राजकीय नेते आणि बिल्डर लॉबी यांच्या कात्रीत सर्वसामान्य माणूस अडकलाय. काही इमारतींची राजकीय नेत्यांनी पुनर्बांधणी केली. पण मनपाने या इमारती अनधिकृत ठरवल्या. यामुळे नागरिक धास्तावले. सिडको बांधून देत नाही. रिअल इस्टेटमधल्या मंदीमुळे बिल्डर पुढे येत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच एकत्र येत चांगल्या बिल्डरला हे काम देणं हाच पर्याय असल्याचं तज्ज्ञ सांगतात. 


एकूणच सिडकोच्या या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांना सध्यातरी कोणी वाली नाही अशी स्थिती आहे. एकीकडे भारतात राहण्यास सर्वोत्तम शहरात नवी मुंबईची गणना केली जाते. तर त्याच नवी मुंबईत दिव्याखाली अंधार असल्याचं चित्र या निमित्ताने दिसून येतंय.