सिडको आणि एसबीआयचा घोळ, ग्राहकांना भुर्दंड
`सिडको`च्या ग्राहकांना फटका
मुंबई : 'सिडको'कडून (CIDCO) २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या संगणकीय सोडतीत अनेक ग्राहकांना घराची लॉटरी लागली. या घरांसाठी सहा टप्प्यांमध्ये रक्कम भरण्यासाठी सिडकोकडून सांगण्यात ग्राहकांना कळवण्यात आलं. पहिला हप्ता भरण्यासाठी २४ ऑक्टोबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती. सिडकोच्या या घरांसाठी अनेक सामान्य ग्राहकांनी 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ला (SBI) गृहकर्जासाठी प्रथम पसंती दिली. गृहकर्ज संमत झालेल्या ग्राहकांच्यावतीनं स्टेट बँक ऑफ इंडियानंही अनेक ग्राहकांच्यावतीनं 'सिडको'ला पहिल्या हफ्त्याची रक्कम अदा केली. परंतु, स्टेट बँकेनं २४ ऑक्टोबर रोजी हफ्ता भरल्यानंतरही अनेक ग्राहकांना रक्कम भरल्याची पावती मिळालेली नाही. इतकंच नाही, तर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून भरण्यात आलेले पैसे मात्र 'सिडको'कडे पोहचले नाहीत. याबाबत 'झी मीडिया'कडून सिडकोला विचारणा करण्यात आली तेव्हा, 'हफ्त्याची रक्कम भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात २४ ऑक्टोबर रोजी 'सिडको'च्या वेबसाईटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यानं ग्राहकांना याचा फटका बसला' असं सांगण्यात आलं. पण आता २४ तारखेला सिडकोला पैसे भरल्यानंतरही 'सिडको'कडून अशा ग्राहकांकडून दंड आकारण्यात येत आहे.
या ग्राहकांचा बँकेकडून 'ईएमआय' सुरू झाला असला तरी 'सिडको' मात्र आपल्याकडे पैसेच पोहचले नसल्याचं कारण देत ग्राहकांकडून दंड आकारत आहे. या घोळामुळे सिडकोच्या ग्राहकांना बँक आणि सिडकोच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहे. 'एसबीआय'ने पैसे भरले आणि ते सिडकोच्या अकाऊंटमध्येही पोहोचलेले दिसत आहेत... तरी हा घोळ कशामुळे झाला? आणि रक्कम सिडकोच्या खात्यात जमा झाल्यानंतरही ग्राहकांकडून दंड म्हणून अधिक रक्कम का वसूल केली जात आहे? याचं कारण मात्र 'सिडको'कडून देण्यात आलेलं नाही. त्यामुळे, या प्रक्रियेत ग्राहकांचा काय दोष? असा संताप ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे, 'सिडको'नं आता पैसे भरल्यानंतरही ज्या ग्राहकांकडून दंड आकारला गेला, त्यांच्या तक्रारीची दखल घेण्याची मागणी करण्यात येतेय.