Cidco Lottery News : सिडकोच्या वतीनं जारी करण्यात येणाऱ्या अनेक गृहप्रकल्प योजनांना ग्राहकांनी आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं आहे. (Navi Mumbai) नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये तयार करण्यात आलेल्या अनेक गृहप्रकल्पांमुळं बऱ्याचजणांच्या हक्काच्या घराचं स्वप्नही साकार झालं आहे. अशा या सिडकोनं आता घरांच्या किमती मोठ्या फरकानं कमी केल्या आहेत. पण, हाच निर्णय आता सिडकोला काहीसा महागात पडताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साधारण दोन वर्षांपूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल उक्पन्न गटासाठी सिडकोनं नवी मुंबईच्या उलवे (Ulwe) येथील (Bamandongri) बामणडोंगरी रेल्वे स्थानक भागामध्ये गृहनिर्माण योजना जाहीर केली होती. या योजनेसाठी 2023 मध्ये पार पडलेल्या (Cidco Lottery 2024) सोडतीमध्ये 4869 अर्जदारांच्या वाट्याला विजेतेपदही आलं. सुरुवातीला या घरांच्या किमती 35 लाख 30 हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आल्या होत्या. पण, घरांच्या किमती अधिक असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत अर्जदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच मदतीसाठी धाव घेतली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं यामध्ये लक्ष घालत 29 जानेवारी 2024 ला या घरांच्या किमती 6 लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. घराची मूळ रक्कम 35 लाख 30 हजारांवरून थेट 29 लाख 50 हजार रुपयांवर आली. त्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या अडीच लाखांचं अनुदान जोडल्यास घराची रक्कम थेट 27 लाख रुपयांपर्यंत कमी होत आहे. ही रक्कम इतक्या मोठ्या फरकानं कमी होऊनही अर्जदारांकडून मात्र त्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. 


अद्यापही सोडत प्रक्रियेमध्ये विजयी ठरलेल्या अर्जदारांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्यामुळं आता सिडकोपुढं असणाऱ्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या अर्जदारांनी घरं घेण्यासाठी तयारी दर्शवली आहे त्यांचा आकडा बराच कमी असल्यामुळं आता ही घरं सिडको येत्या काळात अर्जदार विजेत्यांनी नाकारल्यास पुनर्विक्रीसाठी उपलब्ध करणार का आणि केल्यास त्या योजनेला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 


हेसुद्धा वाचा : Mumbai News : मुंबई शहर ते उपनगर.... काय आहेत घरांच्या किमती? एका क्लिकवर जाणून घ्या कोणत्या भागांना सर्वाधिक मागणी


कोणत्या प्रकल्पातील घरांच्या किमती उतरल्या? 


सिडकोच्या वतीनं बामणडोंगरी येथे उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पांमधील घरांचे दर 6 लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्जदारांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पण, सदर निर्णयाला एक महिना उलटूनही अद्याप ग्राहकांनी या घरांसाठी उत्साह दाखवलेला नाही. त्यामुळं आता यावर सिडको नवा तोडगा काढणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.