CIDCO च्या घरांच्या किमती... हक्काचं घर शोधताय? आधी ही Update वाचा
CIDCO Homes : हक्काचं घर घ्यायचा विषय जेव्हाजेव्हा येतो, तेव्हातेव्हा मध्यमवर्गीयांचं लक्ष सिडको आणि म्हाडाच्या गृहयोजनांकडे लागल्याचं पाहायला मिळतं.
CIDCO Homes : नवी मुंबई आणि नजीकच्या परिसरांमध्ये उत्तमोत्तम सुविधा आणि दर्जेदार बांधकाम असणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये खिशाला परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करून देण्यात सिडकोचा मोलाचा वाटा आहे. सामान्यांना मोठी आणि किफायतशीर दरातील घरं देण्यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या याच सिडकोच्या जवळपास 26000 घरांच्या विक्रीसाठीची सोडत जाहिरात नुकतीच जारी करण्यात आली.
12 ऑक्टोबरपासून सोडतीसाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं सुरुही झाली. पण, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सध्या अर्ज भरण्यासाठीचा इच्छुक वर्ग मात्र चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे. सिडकोच्या वतीनं योजना पुस्तिकेत घरांच्या किमतींसंदर्भात माहिती दिली नसल्यामुळं अर्जदार पेचात पडले आहेत.
समोर आलेल्या कारणानुसार काही तांत्रिक अडचणींमुळं घरांच्या किमतींसंदर्भातील माहिती जाहिर करण्याचं राहून देलं. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये या प्रकल्पनिहाय किमती जारी केल्या जाणार असल्याची माहिती सिडकोच्या वतीनं माध्यमांना देण्यात आली. दरम्यान, सिडकोच्या वतीनं सध्या नवी मुंबईतील विविध ठिकाणी असणाऱ्या जवळपास 27 भागांमध्ये 67 हजार घरं उभारली जात आहेत. दरम्यान यापैकी काही घरांची घोषणा नुकतीच झाली असून, त्यासाठी आतापर्यंत 12 हजार 400 अर्ज ऑनलाईन पद्धतीनं आले आहेत.
सिडको सोडतीत शेवटच्या टप्प्यात वाशी, खारघर रेल्वे स्थानक परिसरातील घरांचाही समावेश करण्यात आला आहे. असं असलं तरीही अद्यापही या एकाही प्रकल्पातील घरांच्या किमतीसुद्धा जाहीर झालेल्या नाहीत, ज्यामुळं आता या किमती केव्हा जाहीर होतात याकडेच इच्छुकांचं लक्ष आहे.