कपडे वाळत घालण्यावरून जोरदार हाणामारी; प्रकरण थेट पोहोचलं पोलीस ठाण्यात
या हाणामारीत एका मुलाला गंभीर दुखापत झालीय
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : फिर हेरा फेरी या चित्रपटातील मुन्ना भाई (johnny lever) आणि बाबुराव आपटे (paresh rawal) यांच्यातील कपडे सुकवण्यावरुन झालेला वाद आपण पाहिलाच असेल. आपल्या जागेत कपडे सुकवण्यावरुन दोघेही एकमेकांशी इतके भांडतात की प्रकरण हाणामारीपर्यंत येतं. चित्रपटातील असाच काही प्रसंग प्रत्यक्षातही घडल्याचं समोर आलंय.
बदलापूरमध्ये एका सोसायटीत कपडे वाळत घालण्यावरुन जोरदार वाद झालाय. हा वाद इतका विकोपाला गेला की हे प्रकरण थेट हाणामारीपर्यंत गेलं. आता याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर येथील खरवई परिसरातील ओमकार अपार्टमेंट या हाउसिंग सोसायटीची मीटिंग सुरू असताना एका सदस्याचे सोसायटीमध्ये कपडे वाळत घालत असतानाचे फोटो या बैठकीत एका दुसऱ्या सदस्याने दाखवले. यावरून आमचे फोटो का काढले असा जाब महिलेने विचारला. यावेळी झालेल्या वादातून आपापसामध्ये हाणामारी सुरू झाली.
यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या मुलाला सोसायटीमधील काही सदस्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर सोसायटीच्या खिडकीवर ढकलून दिले. खिडकीच्या काचा त्याच्या हाताला लागल्याने मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बदलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित संशयितांना नोटीस बजावण्यात आली आहे.