सत्ता स्थापनेवरुन शिवसेना-भाजपचा एकमेकांना इशारा
सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपची प्लॅनिंग काय?
देवेंद्र कोल्हटकर, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : शपथविधीसाठी ३१ तारखेचा मुहुर्त ठरल्याची माहिती आहे. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ३० ऑक्टोबरला मुंबईत येणार आहेत. या दौऱ्यात ते मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी ही माहिती दिली आहे.
भाजपा पुन्हा स्वबळावर सत्ता स्थापना करणार अशी चर्चा आता सुरु झाली आहे. शिवसेनेला सोबत न घेता भाजप सत्ता स्थापनेची तयार करत आहे का ? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. शिवसेनेचा आक्रमक नूर पाहता, भाजपा वेगळाच निर्णय घेण्य़ाची शक्यता आहे.
सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनं एकट्याने सरकार स्थापन करावं, असा भाजपमध्ये एक मतप्रवाह आहे. २०१४ प्रमाणेच लवकरच भाजप स्वबळावर सरकारची स्थापना करेल, अशी शक्यता आहे. भाजपानं फ्लोअर टेस्टला जाण्याची तयारीही सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार १५ अपक्षांची भाजपाला साथ आहे... असं असलं तरी मॅजिक फिगर गाठायला २५ आमदार कमी पडतायत...
भाजपाच्या या प्रयत्नांबद्दल शिवसेनेनं खास त्यांच्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. कसं करतात बघू या शिवसेनेच्या प्रश्नाला मागच्यावेळसारखंच करु, असं भाजपाचं उत्तर असेल.
२०१४ मध्येही भाजपचं संख्याबळ होतं १२२, तेव्हाही कुणाचाही पाठिंबा न घेता सरकार स्थापन झालं होतं. त्याहीवेळी विरोधी पक्षात असलेली शिवसेना एका रात्रीत सहभागी झाली होती हा इतिहास आहे.
शिवसेनेला सत्तेत दुय्यम वाटा देण्यासाठी हे भाजपाचं दवाबतंत्र असण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेचा दावा केल्यावर शिवसेना आपसूक नमतं घेत सत्तेत सहभागी होईल, असा एक मतप्रवाह भाजपात आहे. त्यामुळेच भाजपाकडूनही शिवसेनेला इशारा देण्याचं काम सुरू झालं आहे.
शिवसेनेच्या मागण्यांची धार बोथट करुन काही महत्त्वाची खाती देऊन शिवसेनेला गप्प करणं, असाही भाजपचा डाव असू शकतो. जाताजाता, एक इतिहासातली आठवण... गेल्यावेळीही न मागता राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिला होता. एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स...