विमान दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्र्यांची भेट, कारवाईचे आदेश
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
मुंबई : घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सी ९० जातीचं हे चार्टर्ड प्लेन होतं, दोन वैमानिक, दोन इंजिन असलेल्या या विमानानं जुहू विमानतळावरुन उड्डाण केलं होतं. उड्डाण केल्याच्या काही वेळातच घाटकोपरमधल्या सर्वोदय रुग्णालयाजवळ हे विमान कोसळलं. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर हे विमान कोसळलं. एकेकाळी उत्तर प्रदेश सरकारचं असलेलं हे विमान २०१४ साली युवाय अॅव्हिएशनला विकण्यात आलं होतं. या विमानानं प्रशिक्षणासाठी उड्डाण केलं होतं. या अपघातात विमानातल्या चौघांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी घाटकोपरमध्ये जाऊन विमान दुर्घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी परिस्थितीबाबत माहिती घेतली.
महिला वैमानिक मारिया, सह वैमानिक प्रदीप राजपूत, विमान तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे यांचा या अपघातात मृत्यू झालाय. तर त्यावेळी रस्त्यानं जाणाऱ्या एका रहिवाशाचाही मृत्यू झालाय. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय. त्यामुळे काही वेळातच विमानाचा अपघात का झाला, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे..... पायलट मारियाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. हेच विमान रहिवासी भागात कोसळलं असतं तर मोठी जीवितहानी झाली असती, पण मारियाच्या प्रसंगावधानामुळे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हे विमान कोसळलं. त्याचवेळी जेवणाची सुट्टी असल्यानं या इमारतीतले ५० मजूर जेवायला गेले होते. त्यामुळे ते मजूरही या वाचले.