मैत्रीचे बंध आणि विरोधकांचा मान... मुख्यमंत्र्यांनी साधला योग!
राजकीय कसरतीत समतोल राखणं तसं आव्हानंच... हे कौशल्य निवडक राजकीय नेत्यांमध्ये आढळतं...
दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : राजकारणात जसं मित्रांना जपावं लागतं तसा विरोधकांचाही मान ठेवावा लागतो. आणि निवडणुका दृष्टीक्षेपात असतील तर हा राजकीय समतोल सांभाळण्याची सत्ताधारी पक्षाला विशेष काळजी घ्यावी लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घरगुती गणपती दर्शनावेळी हा योग कसा जुळवून आणला त्याची ही गोष्ट...
शिवसेना सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीयसचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीला दर्शनाला जाणं ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जणू प्रथाच बनलीय... नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीच्या दर्शनाचे यंदा त्यांचं चौथं वर्ष...
नार्वेकर पूर्वी मालाड येथील लिबर्टी गार्डन परिसरात राहायचे. गेल्या वर्षी ते वांद्रे पूर्व, पाली हिल येथील कुकरेजा हाईट्स या इमारतीत राहण्यास आले. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी येण्याची प्रथा कायम ठेवलीय... त्यानुसार ते काल रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास नार्वेकर यांच्या घरी आले...
गणपती दर्शनानंतर नार्वेकर यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढले. त्यानंतर नार्वेकर आणि मुख्यमंत्रयांमध्ये काही वेळ गप्पाही रंगल्या... पण या घटनेत रंगत तेव्हा आली जेव्हा नार्वेकर यांची भेट आटोपून मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा वरच्या मजल्याकडे वळवला...
या इमारतीत सातव्या मजल्यावर नार्वेकर राहतात, तर आठव्या मजल्यावर काँग्रेसचे नेते आणि आघाडी सरकारमधले माजी मंत्री कृपाशंकर सिंह राहतात... मुख्यमंत्र्यांनी कृपाशंकर यांच्या घरगुती गणपती दर्शनाचा योग जुळवून आणला... ते पहिल्यांदाच कृपाशंकर सिंह यांच्याकडे गेल्याचं सांगितलं जातंय. इथंही कृपा यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढण्याची हौस भागवून घेतली... त्यानंतर मुख्यमंत्री आणि कृपाशंकर सिंह यांच्यातही गप्पा रंगल्या...
राकारणातील मित्र आणि शत्रू अशा दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या घरात मुख्यमंत्र्यांच्या वावर आणि संवादात अतिशय सहजता होती... एकीकडे युतीतल्या सरकारमध्ये असून अलीकडे रोज निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करण्याऱ्या शिवसेनेला जपणं, तर दुसरीकडे वाढती महागाई, इंधन दरवाढ, कायदा- सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न या आणि अशा अनेक विषयांवर सरकारला घेरणाऱ्या विरोधी पक्षातील काँग्रेसचाही मान राखणं हे तसं पाहिलं तर खूप कठीण काम... या राजकीय कसरतीत समतोल राखणं तसं आव्हानंच... हे कौशल्य निवडक राजकीय नेत्यांमध्ये आढळतं... अनुभावातून ते स्वतःच आत्मसात करावं लागतं... आणि देवेंद्र फडणवीस यांना ते खुबीने जमतंय.